अहिल्यानगर मराठी न्युज : प्रतिनिधी चंद्रकांत वाखुरे
पाथर्डी : शहरातील जुने बस स्टँड परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच दोन दिवसांत दोन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याने पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. विलास पुजारी यांनी आगार प्रमुख, एस.टी. डेपो पाथर्डी यांना थेट पत्र पाठवून सीसीटीव्ही बसवण्याबाबत तीव्र शब्दांत मागणी केली आहे.
दि. २४ जुलै रोजी पुण्यातील वाघोली येथील काजीम इब्राहीम सय्यद या नागरिकाच्या गळ्यातील चार तोळे सोन्याची चैन बसमध्ये चढताना चोरट्यांनी लांबवली. तर ३० जुलै रोजी पाथर्डीतील ज्योती ओस्तवाल यांच्या पर्समधून अडीच तोळ्याचे दागिने चोरीला गेले. दोन्ही घटना पाथर्डीच्या जुन्या बस स्टँडवर घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर निरीक्षक पुजारी यांनी आगार प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “याआधीही तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. मुठकुळे यांनी कॅमेरे बसवण्याची मागणी केली होती, मात्र अजूनही ती पूर्ण झालेली नाही. यामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार घडतो आहे.”
पुढे ते म्हणतात, “तत्काळ जुने बस स्टँड पाथर्डी येथे सीसीटीव्ही बसवावेत आणि त्याचा अहवाल पोलीस ठाण्यास सादर करावा, अन्यथा प्रचलित कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.”
पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या कार्यतत्परतेचे नागरिकांतून विशेष कौतुक होत असून, त्यांनी वेळेवर योग्य ती भूमिका बजावत बस स्थानक परिसरात सुरक्षेचा प्रश्न उचलून धरला आहे.
स्थानिक जनतेनेही एस.टी. प्रशासनाकडे कॅमेरे लावण्याची मागणी जोरात केली असून, पुजारी साहेबांच्या या ठाम भूमिकेमुळे भविष्यात अशा चोरीच्या घटना रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.