September 11, 2025 10:44 am

अहिल्यानगर जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन– जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे

अहिल्यानगर, दि. ३१ – महसूल विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा व विविध योजनांची माहिती मिळावी, त्यांचा लाभ घेता यावा, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि शासनाबद्दलचा विश्वास वाढावा, या उद्देशाने जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार हा सप्ताह साजरा करण्यात येणार असून यादरम्यान महसूल विभागाच्या सेवा प्रभावीपणे नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातील. शेतकरी व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण व महसूल विषयक जनजागृती हा सप्ताह साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी महसूल सप्ताहाचा शुभारंभ होईल. कार्यरत व सेवानिवृत्त महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात येईल. उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात येतील. मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरणही होईल.

शनिवार, २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी असलेल्या पात्र कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वितरित करण्याचा कार्यक्रम होईल.

रविवार, ३ ऑगस्ट रोजी पाणंद व शिवार रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

सोमवार, ४ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान मंडळनिहाय राबवले जाणार आहे.

मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी प्रक्रिया अपूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देऊन डीबीटी पूर्ण करून अनुदान वितरित केले जाईल.

बुधवार, ६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार असून, शर्तभंग झालेल्या जमिनींचे सरकारजमा करण्याचा निर्णय शासन धोरणानुसार घेतला जाणार आहे.

गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी एम-सँड धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल. नवीन मानक कार्यपद्धतीनुसार हे धोरण पूर्णत्वास नेले जाईल. याच दिवशी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ संपन्न होणार आहे.

या सप्ताहातील सर्व कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें