अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
राहूरी प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ७५ गुन्हे दाखल केलेले आहेत.
ध्वनी प्रदूषणाच्या उल्लंघनाबाबत माननीय न्यायालयामध्ये यापूर्वी प्रकरणे दाखल झालेली आहेत. माननीय न्यायालयाने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या कारवाई करणे बाबतचे निर्देश देखील दिलेले आहेत. एलईडी लाइट्समुळे लहान मुलांच्या डोळ्यावर परिणाम, ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठांच्या हृदय, कान व रक्तदाबावर परिणाम अशा घटना टाळण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद पूर्वी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उत्सव मंडळांच्या बैठका घेऊन ध्वनी प्रदूषणास नियंत्रण ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच सोलापूर प्रमाणे एलईडी लाइट्स, मिड प्रेशर व सी.ओ. टू गॅस इत्यादीवर प्रतिबंध करणारे आदेश देखील उत्सवापूर्वी काढण्यात आले होते. परंतु काही मंडळांनी याकडे दुर्लक्ष केल्याने गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. गुन्हे नोंदवल्यानंतर ध्वनी प्रदूषण करणारे साहित्य देखील पोलीस विभागाकडून जप्त करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे पोलीस ठाणे कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प यांनी नोंदवले आहेत. तसेच पोलीस ठाणे नगर तालुका, संगमनेर शहर, अकोले व शिर्डी या पोलीस ठाण्यांनी देखील ध्वनी प्रदूषणाचे गुन्हे नोंदवले आहेत.
या वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातील ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर केलेली कारवाई ही मागील काही वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे.
ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर यापुढे देखील अशीच कठोर कारवाई सुरू राहील असे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट केले आहे.
ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने केलेली कारवाई पाहता भविष्यात सण उत्सवाच्या अनुषंगाने आयोजक व संयोजक यांचा पारंपरिक वाद्य वापर करण्याकडे कल राहील त्यामुळे या कायद्याच्या उद्देश सफल होण्यास मदत होईल.
ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी केलेल्या कारवाईबाबत नागरिकांनी पोलीस विभागाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.