September 19, 2025 8:35 am

मोहटादेवी गडावर ५२ दुकानदारांवर अतिक्रमण प्रकरणी गुन्हे दाखल :: पोलिस प्रशासनाची धडक कारवाई

अहिल्यानगर मराठी न्यूज शहाजी दिघे
पाथर्डी प्रतिनिधी : पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री मोहटादेवी गड पायथा परिसरात शुक्रवारी पोलिस व महसूल प्रशासनाने अतिक्रमणाविरोधात भरीव व निर्णायक कारवाई केली. गड पायथ्याशी ४८ दुकाने तर मोहटा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ४ दुकाने अशा एकूण ५२ दुकानांनी सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून व्यापारी व्यवहार सुरू केला होता. या अतिक्रमणामुळे भाविकांच्या सुरक्षिततेला व प्रवासाला धोका निर्माण झाला होता. नवरात्रोत्सव अगदी जवळ आल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी गडावर होणार होती. गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये, वाहतूक कोंडी होऊ नये आणि भाविकांची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी पोलिस व महसूल प्रशासनाने थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला.
या कारवाईत पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक निवृत्ती आगरकर, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल कांबळे, पंचायत समिती बांधकाम विभागाचे अभियंता अर्जुन पठाडे व सुभाष केदार तसेच महसूल विभागाचे अधिकारी सहभागी झाले. पथकाने सर्व दुकाने मोजणी करून स्पष्ट केले की रस्त्याच्या मध्यापासून ६ मीटर मोकळा रस्ता ठेवणे बंधनकारक आहे. दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीसह भाविकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याने प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८५ अन्वये पंचनामे करून दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रशासनाने दुकानदारांना तातडीने अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश देत स्पष्ट इशारा दिला की येत्या १६ सप्टेंबर रोजी पुन्हा तपासणी होईल आणि त्या दिवशीही अतिक्रमण कायम असल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल. या कारवाईमुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडाली असून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने दाखवलेला हा काटेकोरपणा कौतुकास्पद ठरत आहे.
१२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता अतिक्रमण बंदोबस्तासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. या पथकाचे नेतृत्व सहाय्यक पोलिस निरीक्षक निवृत्ती आगरकर यांनी केले. या पथकात सहाय्यक उपनिरीक्षक लबडे मिरी, हेड कॉन्स्टेबल कुसळकर मिरी, हेड कॉन्स्टेबल आव्हाड – टाऊन बिट, हेड कॉन्स्टेबल बटुळे टाऊन बिट, हेड कॉन्स्टेबल अल्ताफ शेख करंजी , रायटर पोलीस शिपाई लबडे, रायटर पोलीस शिपाई टकले, रायटर पोलीस शिपाई गणगे, पोलीस शिपाई पालवे, पोलीस नाईक धोत्रे, पोलीस शिपाई तांबे आणि पोलीस शिपाई राठोड या अंमलदारांचा समावेश होता. प्रत्येक अंमलदाराला बी एन एस २८५ नुसार प्रत्येकी १० प्रकरणांचे पंचनामे इ साक्ष ऍप मध्ये नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागासोबत पथक क्रमांक २ ने अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी पार पाडली.
या कारवाईनंतर पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी सांगितले की, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. गर्दीच्या वेळी रस्ते मोकळे ठेवणे अत्यावश्यक आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून ही कारवाई केली आहे. अनेक वर्षांपासून अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा झाल्या असल्या तरी यावेळी प्रथमच गुन्हे दाखल करून निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे भविष्यात कोणीही अतिक्रमण करण्याचे धाडस करणार नाही.
या धडक कारवाईचे भाविक व ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले. प्रशासनाने दाखवलेली तत्परता, पोलिस विभागाने दाखवलेला काटेकोरपणा आणि महसूल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले सहकार्य यामुळे गड परिसर सुटसुटीत, सुरक्षित आणि भाविकांसाठी सोयीस्कर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाने जनतेच्या सुरक्षेसाठी दाखवलेली बांधिलकी आणि कायद्याची ठाम अंमलबजावणी हीच या कारवाईची खरी ताकद ठरली आहे.
मोहटादेवी गडावर अतिक्रमण करणाऱ्या ५२ दुकानदारांविरुद्ध नोंदवलेले गुन्हे हे फक्त कागदी कारवाई नसून भाविकांच्या सुरक्षेसाठी, वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणि कायद्याच्या पालनासाठी केलेली ठाम कृती आहे. पोलिस प्रशासनाचे हे धाडस आणि तत्परता भाविक व ग्रामस्थांच्या दृष्टीने दिलासादायक आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें