अहिल्यानगर : ध्वनी प्रदूषण सुधारित नियम, २०१७ अन्वये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतागृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत १५ दिवसांसाठी ध्वनी प्रदूषणाची पातळी विहित मर्यादेत राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांच्या वापरास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आदेशाद्वारे परवानगी दिली आहे.
आवश्यकतेनुसार मिळणार परवानगी
ता. १९ फेब्रुवारी २०२५ शिवजयंती (तारखेनुसार शासकीय), १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, २८ ऑगस्ट, १,२ व ६ सप्टेंबर गणपती उत्सव, ५ सप्टेंबर ईद-ए-मिलाद, २९ व ३० सप्टेंबर नवरात्र उत्सव, २१ ऑक्टोबर दीपावली, २५ डिसेंबर ख्रिसमस, ३१ डिसेंबर २०२५ व उर्वरित दोन दिवस शासनाने विहित केलेल्या अटीच्या अधिन राहून आवश्यकतेनुसार परवानगी देण्यात येईल.
वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशामधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी. तसेच निवडणूक कालावधीत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचार संहितेचा नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.