September 11, 2025 1:26 pm

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती युवापिढीला दिशादर्शक ठरेल-प्रा.राम शिंदे

अहिल्यानगर : शहाजी दिघे

अहिल्यानगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची तसेच त्यांच्या शौर्याची चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येणारी माहिती युवापिढीला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये (दूरदृष्यप्रणालीद्वारे) उद्घाटन करण्यात आले.

अहिल्यानगर पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सह संचालक राम पांडे,पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, महेंद्र गंधे आदी उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात समाजातील शोषित, पीडित व वंचितांना न्याय मिळवून देण्याबरोबरच अनेक धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार, जलसंवर्धन आणि समाजातील अपप्रवृत्तीला आळा घालण्याचे काम केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्यात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून चौंडी विकासकामाच्या बृहतआराखड्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती राज्यातील युवा पिढीपर्यंत जावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारच्या चित्ररथाचे आयोजन करावे, असेही ते म्हणाले.

मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, धर्मपरायणता, दानशूरपणा व मानवतावाद हे गुण अंगी असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान व कार्यक्षम राज्यकर्त्या होत्या. कृषी कर पद्धतीमध्ये सुधारणा, महिलांना विशेष हक्क, वस्त्रोद्योगास चालना व आर्थिक सुधारणा हे त्यांचे कार्य इतिहासात अजरामर झाले. बारव आणि घाटांची उभारणी, अन्नछत्र निर्मिती, मंदिरांचे जीर्णोद्धार आदी असंख्य समाजोपयोगी कार्यक्रम अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचे वैशिष्ठ्य असल्याचेही ते म्हणाले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती जनमानासापर्यंत पोहोचवण्यासाठी चित्ररथाची निर्मिती करण्यात आली असल्याचे सांगत श्री.शेलार म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राज्यातील सहा विभागात दर्जेदार कार्यक्रम घेण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या गुणवर्णनाचा कार्यक्रम प्रत्येक जिल्हास्तरावर घेण्यात येणार आहे. त्यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच टपाल तिकिटाचे अनावरणही करण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकरांनी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी, घाट व बारव निर्माणसाठी, महिलांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य तसेच प्रशासनातील नेतृत्व व सामान्यांसाठी वेचलेल्या आयुष्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

रोजगाराभिमुख औद्योगिक धोरण, अंधश्रद्धा निर्मूलन, अनिष्ट रूढी बंद करणे, धर्मशाळांची उभारणी, करप्रणाली या विकासाच्या दिशा या त्यांच्या आयुष्यातल्या अग्रणी कर्तुत्वाचा भाग असल्याचेही मंत्री शेलार म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याची माहिती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत चित्ररथाच्या माध्यमातून पोहोचविण्याऱ्या सुंदर अशा चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या जीवनात जलसंवर्धनाला अधिक महत्व दिले.त्यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने जिल्ह्यातील ३०० तलाव गाळमुक्त करण्याचा प्रयत्न करू, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सह संचालक राम पांडे यांनी चित्ररथाविषयी माहिती दिली.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें