अहिल्यानगर :शहाजी दिघे
शिर्डीतील मतदार संख्येचा विवाद: राहूल गांधी विरुद्ध विखे पाटील
शिर्डी येथे झालेल्या एका दुहेरी हत्याकांडानंतर, राजकीय वातावरण तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी शिर्डी मतदारसंघातील मतदार संख्येच्या वाढीबाबत चौकशीचा मुद्दा उभा केला आहे. राहूल गांधी यांनी लोकसभेत म्हटले आहे की, शिर्डीतील एका इमारतीत ७ हजार नवीन मतदार नोंदवले गेले आहेत, ही बाब अत्यंत शंकास्पद आहे.
विखे पाटील यांची प्रतिक्रिया
जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहूल गांधी यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, “राहूल गांधी यांनी शिर्डी मतदारसंघाबाबत केलेल्या विधानात भान ठेवले पाहिजे. जनाधार गमावलेले नेते आता चुकीची विधान करून जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करीत आहेत.” विखे पाटील यांनी असे सांगितले की, राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या जनादेशाचे खरे दुख राहूल गांधी यांना आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व
विखे पाटील यांनी यावेळी येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचेच वर्चस्व राहील, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “ज्यांचा पराभव झाला त्यांनीच राहूल गांधी यांना चुकीची माहीती पुरवली असण्याची शक्यता आहे. आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी धडपड करीत आहेत.”
सुरक्षा उपाययोजना
शिर्डी मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाची घटना अत्यंत दुर्दैवी असून, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर उपाय योजना करण्याची गरज आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत की, पुढील आठवड्यात शहरात पुन्हा एकदा कोबिंग आॅपरेशन करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावल उचलावीत. आजच्या घटनेत पोलीसांचा हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्याबाबत आदेश दिले असल्याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.
बैठक आणि मागण्या
सांयकाळी उशिरा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ आणि वरीष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत शहरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय छुप्या पध्दतीने सुरू असून याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील पाॅलिश वाल्यावर तसेच रात्री उशिरा पर्यत शहरात फिरणार्यावर कारवाई करण्यात यावी, बेकायदेशीर सुरू असलेल्या रीक्षांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, असे सुचवण्यात आले. मंदीर परीसरातील सुरक्षेसाठी असलेले पोलीस आता शहराच्या सुरक्षेसाठी वापरावेत, असी सूचना ना.विखे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिली.