पारनेर :गणेश वाघ
पारनेर : सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी ही आमची मागणी आहे. त्यासंदर्भात आपण संबंधित मंत्र्यांची भेट घेउन निवेदन सादर करणार आहोत. मागणीची दखल न घेतली गेल्यास सोमवारी (ता. १०) संसदेबाहेर या प्रश्नावर आंदोलन करू, असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला. संसदेच्या अधिवेशनामध्ये नवी दिल्लीमध्ये असलेल्या खासदार निलेश लंके यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली.
या भेटीनंतर पवार यांच्या निवासस्थानाबाहेर खासदार लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार लंके म्हणाले, सोयाबीन खरेदीसाठी शासनातर्फे मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ भेटलीच पाहिजे. यासंदर्भात संबंधित मंत्र्यांशी आपण पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.