लोणी :शहाजी दिघे
लोणी :कृषी व्यवस्थेत काळानुरूप होणारे बदल स्विकारल्या शिवाय आता पर्याय नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक खतांचा योग्य उपयोग करुन, उत्पादन क्षमता वाढविण्याचे आव्हान यापुढे स्विकारावे लागणार आहे. सेंद्रीय शेती करीता केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण हे उपयुक्त ठरणार असून, निर्यातक्षम उत्पादन निर्माण करण्यासाठी आता कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी सुध्दा मार्गदर्शन करण्याची भूमिका एकत्रितपणे बजावावी. असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
डाळींब रत्न बाबासाहेब गोरे यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या डाळींब बहार मेळावा तसेच कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन ना. विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ह.भ.प महंत उध्दव महाराज मंडलिक, जिल्हा अधिक्षक कृषी आधिकारी सुधाकर बोराळे, बाजार समितीचे उपसभापती आण्णासाहेब कडू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाचे सदस्य ऋषिकेश खांदे, तालुका कृषी आधिकारी आबासाहेब भोरे, सतिष बावके, संदिप निर्मळ, सचिन चिंधे, हर्षल खांदे यांच्यासह डाळींब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.