साकुर :प्रतिनिधी
साकुर : संगमनेर मतदारसंघातील साकुर येथे आदिवासी आश्रम शाळेला आमदार अमोल खताळ यांनी अचानक भेट दिली असता,
शाळेतील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची बाब आमदार अमोल यांच्या भेटीअंती निदर्शनास आली .
यावेळी विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळून आल्या. निकृष्ट दर्जाच्या चपात्या, भाजी अत्यल्प प्रमाणात आणि जेवणात पोषणमूल्यांचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले.
विद्यार्थ्यांना चांगले अन्न मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी असलेले वॉटर फिल्टर खराब अवस्थेत असून विद्यार्थ्यांना पिण्यायोग्य पाणी मिळत नाही.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत शाळा व्यवस्थापनाला तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि शिक्षणाशी होणारा हलगर्जीपणा इथून पुढे सहन केला जाणार नाही, असे ठणकावून सांगितले. यावर तातडीने उपाययोजना झाल्या नाही तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट सांगितले आहे.