September 21, 2025 11:18 pm

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ चे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक डॉ.पंकज आशिया

अहिल्यानगर प्रतिनिधी

अहिल्यानगर दि.१५- जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात कृषी विभागाने पाणी वापर संस्थांसोबत समन्वय साधून पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पद्धतीत बदल घडवून आणण्यावर भर द्यावा आणि सर्व विभागांनी मिळून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले. 

  नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवडाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महानगर पालिका आयुक्त यशवंत डांगे, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेट्ये, संतोष सांगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे आदी उपस्थित होते. 

 जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सर्व शासकीय विभागांचा सहभाग अपेक्षित आहे. सर्वांनी समन्वयाच्या माध्यमातून उद्दिष्टानुसार कार्यक्रमाचे योग्य व्यवस्थापन करावे. तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांचाही यात सहभाग घ्यावा. 

जिल्ह्याला उन्हाळ्यात पाणी समस्येला सामोरे जावे लागते. शेतीसाठी पाणी आवश्यक असताना जिल्ह्याच्या विविध भागात पाण्याचे असमान वितरण आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाण्याचे महत्व पटवून द्यावे लागेल. जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार योजना प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. प्रमुख नद्यांचे पुनरूज्जीवन लोकसहभागातून करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

 स्थानिक स्वराज्य संस्थांना पाण्याचे महत्व समजावणे आणि गावातील पाण्याचे बजेट तयार करणे गरजेचे आहे. पाण्याची कमतरता असताना पाणी उपचारावरही भर देण्यात यावा. सर्व विभागांनी केवळ १५ दिवस उपक्रम न राबविता वर्षभर निश्चित उद्दिष्ट समोर ठेऊन नियोजनावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

 श्री. शेट्ये म्हणाले, पाण्याचे स्रोत मर्यादित असून पाण्याची मागणी वाढते आहे. ही तफावत दूर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, बिगर सिंचनाच्या पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने जल व्यवस्थापन कृती आराखडा घरोघरी पोहोचविण्यासाठी हा उपक्रम रबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर पोहोचून पाण्याशी निगडित नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. पाणी व्यवस्थापनाचे नवे तंत्र, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याबाबत जागरूकता निर्माण करावी लागेल. पाण्याचे मोल सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

  श्री. सांगळे म्हणाले, अन्न ही सजीवांची मूलभूत गरज असून त्यासाठी जमीन आणि पाणी आवश्यक आहे. पाण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. पाण्यावर सर्व सजीवांचा हक्क आहे. मात्र माणसाने विकासासोबत पाण्याचा अनिर्बंध वापर सुरू केल्याने पाण्याचे संकट निर्माण झाले, अनेक समस्या निर्माण झाल्या. त्या दूर करण्यासाठी पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. यात शासनाच्या विविध विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. जलसंपदा विभागामार्फत या कालावधीत जलजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

श्री. बोराळे म्हणाले, जिल्ह्यातील बहुतांशी जनता शेती व्यवसायावर आधारित आहे. त्यांच्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. पाणी हे जीवन असल्याने त्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व जाणून घ्यायला हवे. शेतीसाठी योग्य सिंचनाची सुविधा निर्माण होणे तेवढेच महत्वाचे आहे. त्यादृष्टीने स्रोताचे योग्य व्यवस्थापन आणि त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. गायसमुद्रे म्हणाले, भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचे महत्व समजून घेण्याची आणि जलसंवर्धन करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पातील गाळ काढणे, जलयुक्त शिवार २. ०, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना आदी उपक्रम राबविण्यात येतात. पाण्याचे महत्व नागरिकांना सांगण्यासाठी गावापातळीवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

प्रस्ताविकात कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. पाण्याची उपलब्धता, नियोजन, पाण्याची बचत याबाबत जनजागृती करण्यासाठी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाभरात येत्या १५ दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘जलसंपदा आपल्या गावी’ या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या गावातच दूर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आमदार संग्राम जगताप यांच्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले.

कार्यक्रमपूर्वी जिल्ह्यातील सहा नद्यांचे जल असलेल्या कलशाचे पूजन करण्यात आले, तसेच उपस्थितांनी जलप्रतिज्ञा घेतली. पंधरवड्यानिमित्त जनजागृती करणाऱ्या चित्ररथाचा शुभारंभ डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा