अहिल्यानगर मराठी न्यूज
धानोरे (प्रतिनिधी ) : श्रावण महिना, विशेषतः सोमवार, हा शंकराच्या उपासनेसाठी महत्त्वाचा असल्याने, या काळात धनेश्वर देवस्थान धानोरे येथे तालुक्यातून भाविक येत आहेत. धनेश्वर मंदिराचे बांधकाम इ.स.१७७० मधील असल्याचे सांगितले जाते . हे मंदिर राहूरी तालुक्यातील प्राचीन आणि महत्त्वपूर्ण मंदिरांपैकी एक मानले जाते. या मंदिराचा अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेला आहे आणि मंदिर बांधकाम वेळी प्रवरा नदीवर नागरिकांना पाणवठ्यावर जाता यावे म्हणून घाट बांधला आहे. या ठिकाणी प्रवरा नदी दक्षिण उत्तर वाहिनी असल्याने पूजा, धार्मिक विधी साठी विशेष महत्व प्राप्त आहे. याच ठिकाणाहून केशव गोविंद हे उक्कलगाव, बेलापूर, चांदेगांव येथे गेल्याचे इतिहासात नोंदी आढळून आल्या आहेत. तसेच धनेश्वर महादेव यांच्याबरोबरच भगवान दत्तात्रय,हनुमान, विठ्ठल रुक्मिणी, गणपती, अंबिका माता, विश्वकर्मा, गहिनीनाथ,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, कमळजा माता व स्वामी समर्थ सेवा केंद्र ही मंदिरे आहेत व १११ फूट उंचीवर धर्मध्वज दिमाखात फडकत आहे. याठिकाणी आजपर्यंत अनेक साधू संत, धार्मिक गुरू यांचे पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे.येथे प्रवरा नदीचा प्रवाह दक्षिण उत्तर वाहिनी झालेली असल्याने व पवित्र ठिकाण असल्याने परिसरातून दशक्रिया विधी साठी लोक येतात. नुकताच धनेश्वर महादेव व अंबिका माता, कमळजा माता यांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला असुन सध्या गावाकऱ्यांनी देवस्थान ची दिवाबत्ती, स्वच्छता, मंदिर देखभाल रहावी व नवनवीन धार्मिक उपक्रम राबविले जावे यासाठी ट्रस्ट स्थापन केलेले आहे. ट्रस्ट च्या वतीने नवनवीन उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये एकादशी भजन,आषाढी एकादशी साजरी करणे, दिंडी सोहळे साजरे करणे, घाट परिसर स्वच्छता ठेवणे,वृक्षारोपण, सप्ताहाचे आयोजन करणे, धार्मिक विधी चे आयोजन करणे या करिता नियुक्त केलेले स्वयंसेवक कार्यरत आहेत घाट परिसर हा एक भव्य आणि पवित्र पूजास्थान म्हणून उभे आहे.तसेच सध्या घाट परिसर श्रावण महिन्या निमित्त विद्युत रोषणाई ने तसेच भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.