अहिल्यानगर मराठी न्यूज :अनिल वाकचौरे
सात्रळ, दि. २७: लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सात्रळ, ता. राहुरी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने श्री संत कवी महिपती महाराज श्रीक्षेत्र ताहाराबाद याठिकाणी “स्वच्छता वारी उपक्रम” संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी दिली.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेमधील १०५ स्वयंसेवकांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला. श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे ‘श्री पांडुरंग महोत्सव’ नुकताच संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्रामधून विठ्ठल भक्त पांडुरंगाच्या सेवेसाठी प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र ताहाराबाद या ठिकाणी दाखल झाले होते. यात्रेदरम्यान आठ लाख भाविकांनी हजेरी नोंदवली होती. यात्रा संपन्न झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण झालेला होता. या घनकचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून सात्रळ महा विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात श्रमदान करून परिसर स्वच्छता करण्यासाठी योगदान दिले.
याप्रसंगी श्री संत कवी महिपती महाराज श्री क्षेत्र ताहाराबाद देवस्थानाचे मठधिपती ह. भ.प अर्जुन महाराज तनपुरे, अध्यक्ष श्री. राजेंद्र साबळे पाटील, सचिव श्री.बाळासाहेब मुसमाडे तसेच सरपंच श्री. निवृत्ती घनदाट व सदस्य श्री. दत्तात्रय औटी उपस्थित होते. मंदिर व यात्रा परिसर स्वच्छता केल्यानंतर ह.भ.प अर्जुन महाराज तनपुरे यांनी समाजजीवनामध्ये समाजात एक चांगले नागरिक होण्यासाठी ईश्वरसेवेबरोबर स्वच्छता सेवा ही महत्त्वाची आहे, याचे महत्त्व त्यांनी आपल्या वाणीतून प्रकट केले. प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व सांगितले.
” विद्यार्थ्यांची स्वच्छता वारी” या उपक्रमास उपक्रमास समस्त ग्रामस्थांनी सहकार्य केले. उपस्थित विद्यार्थ्यांना देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. स्वच्छता वारी यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, प्रो. (डॉ.) आर.डी.बोरसे, डॉ. बी.एन.नवले, श्री. डी. एन. घाणे, श्री. महेंद्र तांबे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री. संदीप राजभोज, डॉ. विजय शिंदे, श्री. सुधीर वाघे, श्री. प्रतिभा विखे, श्री. प्रियंका गागरे, सेवक वृंद व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी खूप परिश्रम घेतले.