अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
पाथर्डी : तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावरील घाट रस्त्याचे रुंदीकरणाचे काम चालू असून सदरील घाट रस्ता हा २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समिती दिली आहे. देवस्थान समितीने माहिती देतांना सांगितले आहे की, गडावरील घाट रस्त्याचे काम चालू असल्याने मोठी व छोटी वाहने थेट गडापर्यंत आणता येणार नाहीत. त्यामुळे विशेषतः वयोवृद्ध, अपंग, आजारी भाविकांना या कालावधीत दर्शनाचे नियोजन करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. भाविकांची वाहने ही केवळ गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या भक्तनिवासा पर्यंतच आणता येतील. तेथून गडावरील देवीच्या दर्शनासाठी भाविकांना पायी प्रवास करावा लागेल. पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गड हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी येथे शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. यंदा या उत्सवापूर्वी गडावरील रस्ते आणि मूलभूत सुविधा अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी ट्रस्टने व्यापक कामे हाती घेतली आहेत. यामध्ये रस्ता रुंदीकरणासह अन्य विकासकामांना सध्या वेग आला आहे, जेणेकरून भाविकांना नवरात्रोत्सवात गडावर येण्यासाठी उत्तम मार्ग उपलब्ध होईल. शारदीय नवरात्रोत्सव हा मोहटादेवी गडावरील सर्वात मोठा उत्सव असून, यावेळी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या उत्सवाला अधिक भव्य दिव्य करण्यासाठी ट्रस्टने सर्वंकष तयारी सुरू केली आहे. यामध्ये निवास, पाणी, स्वच्छता आणि सुरक्षितता यासारख्या सुविधांचा समावेश आहे. रस्ता रुंदीकरण आणि इतर सुधारणांचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा ट्रस्टचा मानस आहे जेणेकरून भाविकांना भविष्यात अधिक चांगल्या सोयी सुविधांचा लाभ घेता येईल. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.