अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
सात्रळ प्रतिनिधी (अनिल वाकचौरे) : २१ ऑगस्ट २०२५ रोजी आनंद गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल येथे गणेशोत्सवाचे औचित्य साधून मातीच्या गणपती मूर्ती बनविण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमामागील उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, सांस्कृतिक वारसा जपणे, पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणे, तसेच आनंदमय शिक्षण घडविणे हे होते.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. शाडू व मातीचा उपयोग करून विविध आकार व प्रकारातील आकर्षक गणपती मूर्ती त्यांनी साकारल्या. मुलांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून मूर्तींना रंग, फुले व पारंपरिक अलंकारांनी सजविले. त्यामुळे शाळेचे प्रांगण सणासुदीच्या उत्साहाने उजळून निघाले.
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मातीशी निगडित कलात्मक तंत्रे समजावून सांगितली. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलतेची जोपासना, समूह कार्यातील सहकार्यभावना, वेळेचे नियोजन व एकाग्रता या गुणांचा विकास झाला.
उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महत्त्व कळाले. रासायनिक रंग व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा शाडूच्या मातीच्या मूर्ती अधिक सुरक्षित व निसर्गपूरक आहेत, हा संदेशही यानिमित्ताने अधोरेखित झाला. मुलांमध्ये संस्कृतीप्रेम, परंपरेबद्दल आदर व निसर्गसंवर्धनाची जाणीव निर्माण झाली.
या उपक्रमामुळे शाळेत आनंदी, सांस्कृतिक व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. शाळेच्या प्राचार्य व शिक्षकवर्गाच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.