अहिल्यानगर – लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर शहर व परिसरातील सुमारे १०० शाळांमध्ये मतदार जनजागृती केल्याबद्दल स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला.
जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने १५ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृती करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते डॉ. शिंदे यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणुक शाखा) राहुल पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. उद्धव शिंदे यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी
शहर व परिसरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये मतदार जनजागृती करत मतदान करण्याची शपथ दिली होती. तसेच पालकांनाही जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली होती, याची दखल घेत जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने डॉ उद्धव शिंदे यांचा हा सन्मान करण्यात आला.