भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (१ फेब्रुवारी) आर्थिक वर्ष २०२६ साठी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यात विविध क्षेत्रांसाठी किती निधी असेल आणि कर प्रणाली कशी असेल, याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पानुसार क्रीडा विभागासाठीही निधी जाहीर झाला आहे.
या अर्थसंकल्पात देखील गेल्या अनेक स्पर्धांप्रमाणेच खेलो इंडिया प्रकल्पावरही भर देण्यात आला आहे. निर्मला सितारमन यांनी २०२५-२६ साठी क्रीडा क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या निधीतील १००० कोटी खेलो इंडियासाठी मंजूर करण्यात आला आहे.
साल २०१८ पासून सुरू झालेल्या खेलो इंडिया प्रकल्पासाठी सरकारकडून या स्पर्धेच्या विस्ताराचा प्रयत्न सुरू आहेत. २०२३ पासून खेलो इंडिया पॅरा गेम्सदेखील सुरू करण्यात आले आहेत.
गेल्यावेळी २०२४-२५ अर्थसंकल्पात क्रीडा विभागासाठी सर्वाधिक ३४४२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. गेल्यावर्षी ऑलिम्पिक सारखी मोठी स्पर्धा झाली होती. त्यामुळे निधीही त्यानुसार देण्यात आला होता.
त्यापूर्वी २०२३-२४ साठी क्रीडा क्षेत्रासाठी ३३९७.३२ कोटींचा निधी जाहीर झाला होता. २०२२-२४ साठी ३०६२ कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला होता. ही आकडेवारी पाहाता गेल्या काही वर्षात क्रीडा निधीमध्ये प्रत्येकवर्षी वाढ झाल्याचे दिसत आहे.
मागील काही वर्षांमध्ये भारताचे नाव विविध क्रीडा प्रकारांमध्ये गाजले आहे. भारताचे खेळाडू सातत्याने जागतिक स्तरावर चमकत आहेत. हा विचार करता क्रीडा क्षेत्राच्या निधीमध्येही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
गेल्या सात वर्षातील क्रीडा निधी –
२०१८-१९ – २१९७ कोटी
२०१९-२० – २७७६ कोटी
२०२०-२१ – २८२६ कोटी
२०२१-२२ – २५९६ कोटी
२०२२-२३ – ३०६२ कोटी
२०२३-२४ – ३३९६ कोटी
२०२४-२५ – ३४४२ कोटी