September 11, 2025 12:48 pm

दक्षिण कोरियन नागरिकांना ‘या’ देशात जाण्यास सक्त मनाई; सरकारच्या निर्णयाचे नेमकं कारण काय?

सियोल: मध्य आफ्रिकेतील काँगोच्या पूर्व भागात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे दक्षिण कोरियाने आपल्या नागरिकांसाठी कठोर प्रवास निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. दक्षिण कोरिया सरकारने लादलेले हे सर्वात कडक प्रवास निर्बंध असून नागरिकांना या भागांमध्ये जाण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे सरकारने सांगितले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काँगोच्या उत्तर किवू प्रांतासाठी लेव्हल-4 प्रवासबंदी लागू करण्यात येणार आहे. हा दक्षिण कोरियाच्या सरकारने लावलेला सर्वात कठोर आदेश असून दक्षिण कोरियन नागरिकाला या भागात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच काँगोच्या इतर भागांसाठी लेव्हल-3 चा इशारा कायम ठेवण्यात आला असून नागरिकांना शक्य तितक्या लवकर तेथून निघून जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

काँगोतील वाढता हिंसाचार

काँगोमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार अधिक तीव्र झाला आहे. M23 नावाच्या विद्रोही गटाने काँगोच्या लष्कराविरोधात मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू केले आहेत. इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या विद्रोही गटाने उत्तर किवू प्रांताची राजधानी गोमा शहरावर कब्जा केल्याचा दावा केला आहे. हे शहर प्रादेशिकदृष्ट्या महत्त्वाचे असून येथे सुमारे 10 लाख लोक राहतात. यापैकी 7 लाख लोक आधीच स्थलांतरित झाले असून अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत.

काँगो सरकारचा लष्करी प्रत्युत्तराचा इशारा

काँगोचे अध्यक्ष फेलिक्स त्सेसीकेदी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जनतेला संबोधित करताना म्हटले की, सरकार आपल्या भूमीचे संरक्षण करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल. त्यांनी हेही स्पष्ट केले की, देशाच्या प्रत्येक इंच भूमीवर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्य कारवाई सुरू राहील. आतापर्यंत M23 बंडखोरांनी गोमामध्ये विमानतळ, बंदर आणि स्थानिक लष्करी तळासह अनेक प्रमुख ठिकाणे ताब्यात घेतले आहे.

संयुक्त राष्ट्रांची चिंता

संयुक्त राष्ट्रांनीही काँगोतील या संघर्षाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या प्रवक्त्यांनी, M23 विद्रोही आता दक्षिण किवू प्रांताच्या राजधानी बुकावूच्या दिशेने जात असल्याचे म्हटले आहे. यामुळे तेथील परिस्थिती आणखी अस्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच काही विश्वसनीय अहवालांनुसार, रवांडाच्या सैन्याने देखील सीमा ओलांडून काँगोमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मागील वर्षी आपल्या शांतीमिशन (MONUSCO) ला दक्षिण किवूमधून हटवले होते. यामुळे आता तेथील सुरक्षाव्यवस्था अधिकच ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे.

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण कोरियाने आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काँगोच्या उत्तर किवू प्रांतामध्ये जाण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. तसेच, अन्य भागांत असलेल्या नागरिकांना त्वरित बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें