November 8, 2025 6:38 am

दुग्धयोगी रावसाहेब पाटील म्हस्के यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

अहिल्यानगर मराठी न्यूज

दुग्ध, सहकार आणि समाजकारणातील योगदानाचा मान्यवरांकडून गौरव

अहिल्यानगर : दुग्धचळवळीचे प्रणेते, सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व आणि समाजकारणातील प्रेरणादायी नेता माननीय दुग्धयोगी श्री रावसाहेब पाटील म्हस्के यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहात, भावनिक वातावरणात आणि शेकडो अनुयायांच्या उपस्थितीत पार पडला.

हा सोहळा नाथाजी पाटील म्हस्के शैक्षणिक संस्थेच्या विद्या विकास पब्लिक स्कूलच्या प्रांगणात मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी जिल्ह्यातील तसेच राज्यातील मान्यवर, सहकारी नेते, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात होते. प्रमुख उपस्थितीमध्ये मा. आ. दादाभाऊ कळमकर, खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार आशुतोष काळे, आमदार मीनाताई जगधने, बिपीन कोल्हे, माजी आमदार बी.के. मुरकुटे, खा. भास्कर भगरे, डॉ. सुधीर तांबे, संदीप वर्पे, सचिनराव गुजर, दीपक साळुंखे, बाळासाहेब गायकवाड, वंदनाताई मुरकुटे, महेंद्र शेळके, करण ससाने, राजेंद्र फाळके, अरुण पाटील कडु, शालिनीताई विखे आदी मान्यवर उपस्थित होते.

सहकारातून घडवला ग्रामीण विकासाचा आदर्श

या प्रसंगी नाथाजी पाटील म्हस्के यांच्या पुतळ्याचे अनावरण मा. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि मा. आ. दादाभाऊ कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी रावसाहेब म्हस्के यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेण्यात आला.

बाभळेश्वर दूध संघाची स्थापना करून त्यांनी केवळ दुग्धउद्योगच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी सहकाराचे सामर्थ्य दाखवून दिले. रयत शिक्षण संस्थेमार्फत शिक्षणाचा प्रसार, युवकांना रोजगाराभिमुख उद्योगांची प्रेरणा, तसेच सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले.

या सोहळ्यात दुग्धयोगी रावसाहेब म्हस्के यांच्या कार्याचा गौरव करत मान्यवरांनी त्यांना ग्रामीण विकासाचे प्रणेते आणि सहकार क्षेत्रातील आदर्श नेता म्हणून गौरवले.

सहकार, संघर्ष आणि संस्कारांचा गौरव — रावसाहेब म्हस्के ठरले प्रेरणास्थान

कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले की, “भाऊ (रावसाहेब म्हस्के) आणि कर्मवीर शंकरराव काळे यांचे नाते वडील-मुलासारखे होते. भाऊंनी दूध संघाचे चेअरमन झाल्यावर सहकार क्षेत्रात पहिले आईस्क्रीम प्लांट सुरू केले आणि देशभर श्रीराम आईस्क्रीमचे नाव गाजवले. आज त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांनी जपला पाहिजे.”

सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा देताना म्हटले, “रावसाहेब म्हस्के यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक बळ दिले. त्यांचे कार्य हे प्रेरणादायी आहे.”

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “रावसाहेब म्हस्के यांनी दुग्ध व्यवसाय, सहकार चळवळ आणि शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी सहकाराचे सामर्थ्य ग्रामीण जनतेसमोर उभे केले आणि समाजाला प्रगतीचा मार्ग दाखविला.”

वक्त्यांनी सांगितले की, शरदचंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते, परंतु प्रतिकूल हवामानामुळे त्यांचा दौरा रद्द झाला. तरीही पवार साहेब आणि म्हस्के परिवारातील आत्मीय नाते आजही कायम असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

 समाजसेवेच्या वाटेवर प्रेरणादायी प्रवास

या प्रसंगी रावसाहेब नाथाजी पाटील म्हस्के सहस्रचंद्रदर्शन सोहळा समिती यांच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित नागरिक, दूध उत्पादक आणि कार्यकर्त्यांनी “दुग्धयोगी” या उपाधीला साजेशी कर्तृत्वगाथा असलेल्या रावसाहेब म्हस्के यांना मनःपूर्वक अभिवादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध सूत्रसंचालक संतोष मते यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

शेवटी सर्व उपस्थितांनी रावसाहेब म्हस्के यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या सहकार आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढील पिढ्यांनी जपण्याचा संकल्प केला.

या भव्य सोहळ्याला जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील शेकडो कार्यकर्ते, दूध उत्पादक, सहकारी नेते, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम सहकार, संघर्ष आणि संस्कारांचा उत्सव ठरला आणि अहिल्यानगरच्या सहकार इतिहासात एक सुवर्णपान जोडून गेला.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें