लोणी बुद्रुकमध्ये विकासाची नवी गाथा! १.७१ कोटींच्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससह मटन मार्केट, सांडपाणी प्रकल्प व पशुदाहिनीचे भूमिपूजन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न
लोणी बुद्रुकला डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट–५ कोटींपेक्षा अधिक विकासकामांचा शुभारंभ
लोणी (प्रतिनिधी) : जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून लोणी बुद्रुक येथे तब्बल १ कोटी ७१ लाख रुपये खर्चाच्या भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या भूमि पूजनाचा सोहळा माजी खासदार तथा युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात लोणी व परिसरातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, बाजार समितीचे संचालक व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगीच बाजारतळ मंडईसाठी पत्राशेड व प्रसाधनगृह (१ कोटी ४० लाख रुपये), सांडपाणी प्रकल्पाचे आस्थापिकरण (१ कोटी १२ लाख रुपये) तसेच गोगलगाव येथील घनकचरा प्रकल्पातील पशुदाहिनी (१ कोटी रुपये) या महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजनही करण्यात आले.
तसेच लोणी मटन मार्केट येथील ५० लाख रुपये खर्चाच्या पशुदाहिनीचे लोकार्पण देखील डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. हा सर्व कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता चे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ व गाळेधारकांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संतोष गोरडे पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, नामदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे महाराष्ट्रातील पहिले ‘चिकन-मटन मार्केट’ आहे.
या अत्याधुनिक मार्केटमध्ये ३४ गाळ्यांची निर्मिती करण्यात आली असून, ६० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. स्वच्छतेसाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आली असून, एक कोटी रुपयांचा एसटीपी प्लांट मंजूर करण्यात आला आहे. या प्लांटद्वारे अशुद्ध पाणी शुद्ध करून ड्रेनेजमध्ये सोडले जाईल. तसेच ३६ लाख रुपयांची इन्सिनेरेटर मशीन बसवण्यात आली असून त्याद्वारे जैविक कचऱ्याचे पर्यावरणपूरक निवारण होणार आहे.
या प्रसंगी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “दर पाडव्याच्या बैठकीत आपण चर्चा केलेल्या प्रत्येक प्रश्नाचं आज समाधान झालं आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स, मटन मार्केट, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा प्रकल्प — ही सगळी कामं आता वास्तवात उतरली आहेत. हे केवळ विकासकाम नाही, तर आपल्या गावाच्या एकतेचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे.”
ते पुढे म्हणाले, “गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व अध्यक्ष मॅडम यांनी घेतलेली पुढाकार आज फलद्रूप होत आहे. जे गावांनी मागितलं, ते पूर्ण करण्याचं आपलं वचन आपण निभावलं आहे. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द ही दोन्ही गावं आज महाराष्ट्रातील आदर्श ग्रामपंचायती ठरली आहेत.”
डॉ. विखे पाटील यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याचं विशेष कौतुक करताना सांगितलं, “शॉपिंग कॉम्प्लेक्स स्थलांतराच्या वेळी एकाही ग्रामस्थाने विरोध केला नाही; उलट सर्वांनी एकमताने सहकार्य दिलं. हा विश्वास माझी ताकद आहे, आणि हा विश्वास कधी तुटू देणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “राजकारणात पदं येतात-जातात, पण दिलेला शब्द पाळणं हीच खरी जबाबदारी आहे. लवकरच लोणी गाव हे शहराला टक्कर देईल. बाळासाहेब विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि अध्यक्ष मॅडम यांनी पाहिलेलं स्वप्न आपण सर्व मिळून पूर्ण करू.”
शेवटी त्यांनी बाजार समितीच्या सभापती व संचालकांचे आभार मानत स्वच्छता, पारदर्शकता आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्यास कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता चे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर, ट्रक सोसायटीचे चेअरमन नंदूशेठ राठी, स्थानिक सरपंच, ग्रामसेवक, बाजार समितीचे संचालक तसेच लोणी बुद्रुक व लोणी खुर्दचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.