राहुरी (प्रतिनिधी):“स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे,” असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ते राहुरी येथे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आदरांजली सभेत बोलत होते.
राहुरीतील पांडुरंग लॉन्स येथे झालेल्या या सभेत सुरुवातीला आमदार शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली वाहण्यात आली. व्यासपीठावर युवानेते अक्षय कर्डिले, ज्येष्ठ नेते अँड. सुभाष पाटील, नामदेव पाटील ढोकणे, सुरसिंग पवार, श्यामकाका निमसे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले, “शिवाजीराव कर्डिले हे जनतेशी नाळ जोडलेले नेते होते. मतभेद झाले तरी आमची मैत्री कायम राहिली. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. मुळा धरणाची उंची वाढवणे व गाळ काढण्याचा निर्णय त्यांच्या आग्रहामुळेच झाला. ‘लोक हेच माझे कुटुंब’ ही त्यांची भूमिका होती. विश्रांती हा शब्द त्यांच्या आयुष्यातच नव्हता.”
ते पुढे म्हणाले, “आता आपली जबाबदारी वाढली आहे. अक्षय कर्डिलेच्या मागे ताकद उभी केली पाहिजे. आगामी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राहुरी नगरपालिकेवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा झेंडा फडकावायचा आहे. महायुती सरकारची दानत आणि निर्णयक्षमता मोठी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 54 कोटी रुपये जमा झाले आहेत. मुळा धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, वांबोरी चारी, मानोरी केटी वेअर, पाणी नियोजन आणि विद्यापीठ विषयक कामे पूर्णत्वास नेऊ.”
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “मैत्रीला वय नसते. माझी आणि आमदार कर्डिले यांची मैत्री वेगळीच होती. अक्षय कर्डिले यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. येणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची समिती स्थापन करणार असून, एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच प्राधान्य दिले जाईल. महायुतीचा झेंडा फडकवणे हीच खरी श्रद्धांजली असेल. शिवाजीराव कर्डिले यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विखे पाटील परिवार सदैव सोबत आहे.”
या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, विक्रम तांबे, शिवाजी सागर, सुभाष गायकवाड, अण्णा बलमे, संदीप रासकर आदींनी दिवंगत आमदार कर्डिले यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सभागृहात आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यावर आधारित चित्रफीत दाखवताना वातावरण भावूक झाले.