अहिल्यानगर मराठी न्यूज
अहिल्यानगर (प्रतिनिधी): जिल्ह्यातील काही भागांमध्ये वाघ व बिबट्या दिसल्याच्या घटनांनंतर वन विभागाने नागरिकांना “सावधगिरी बाळगा आणि वन्यजीवांचा आदर करा” असा इशारा देत महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. ग्रामीण भागात विशेषतः सायंकाळनंतर आणि पहाटेच्या वेळेत नागरिकांनी दक्षता घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, वाघ किंवा बिबट्या दिसल्यास कोणत्याही परिस्थितीत त्याच्या जवळ जाऊ नये, पाठलाग करू नये आणि शांतपणे मागे फिरावे. अशा प्रसंगी त्वरित वन विभागाच्या टोल-फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा.
अंधाराच्या वेळी मुलांना एकटे सोडू नये, तसेच रात्री शेतात किंवा शौचास जाताना मोठ्या आवाजात गाणी म्हणा किंवा मोबाईलवर वाजवा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतात जाताना सोबत कंदील, टॉर्च, दणकट काठी आणि शिट्टी ठेवा. ठराविक अंतराने शिट्टी वाजवत राहा, ज्यामुळे प्राणी दचकतात आणि दूर राहतात.
वन विभागाने स्पष्ट केले आहे की, वाघ किंवा बिबट्याने केलेल्या शिकारीच्या ठिकाणी जाऊ नये, कारण प्राणी तेथे लपून बसलेला असू शकतो. पाळीव जनावरे व कुत्री रात्री उघड्यावर सोडू नयेत. जनावरे बंदिस्त गोठ्यात ठेवून तेथे प्रखर उजेडाचा दिवा लावावा.
तसेच, रानडुकरे, हणे व ससे यांचे शिकाऱ्यांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे, कारण हेही बिबट्याचे खाद्य आहे. शेतकरी, विद्यार्थ्यांनी एकटे प्रवास न करता समूहाने जावे, सायंकाळनंतर निर्जन स्थळी थांबू नये.
शेतात वाकून काम करताना बिबट्या भक्ष समजून हल्ला करू शकतो, त्यामुळे गळ्याभोवती जाड स्कार्फ किंवा कापड बांधावे, असेही सूचनांमध्ये म्हटले आहे.
घराच्या बाहेर दिवे लावून ठेवावेत, लाईट वारंवार जात असल्यास सोलर किंवा बॅटरी दिव्याची सोय ठेवावी. गुरे चरायला जाताना समूहाने जा, रात्री एकटे जाऊ नका आणि मोबाईल किंवा रेडिओवर मोठ्या आवाजात गाणी वाजवा.
बिबट्या दिसल्यास शांत उभे राहावे, त्यास डिवचू नये किंवा पाठलाग करू नये. अफवा किंवा गैरसमज सोशल मीडियावर पसरवू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
घराजवळ कचरा साचू देऊ नका, कारण कचरा खाण्यासाठी येणाऱ्या कुत्र्या-डुकरांमागे बिबट्या येऊ शकतो. दाट झुडपे ठेवू नका, त्यात तो लपून बसू शकतो.
उसाचे शेत हे बिबट्याचे संभाव्य आसरे असते, त्यामुळे कापणी करताना विशेष दक्षता बाळगावी. पिल्ले सापडल्यास हाताळू नयेत, कारण जवळ मादी असू शकते.
गाव स्वच्छ ठेवण्यावर वन विभागाचा भर असून, त्यामुळे मोकाट कुत्री व डुकरांची संख्या कमी होते आणि हिंस्र प्राण्यांचे आगमनही टाळता येते.
वन विभागाने नागरिकांना “थोडीशी काळजी घेतल्यास बिबट्याशी संघर्ष टाळता येईल; वन्यजीव ही राष्ट्रीय संपत्ती आहे” अशी जाणीव करून दिली आहे.
📞 बिबट्या दिसल्यास किंवा हल्ला झाल्यास त्वरित संपर्क करा: वन विभाग टोल-फ्री क्रमांक: 1926
*आमच्या व्हिडीओ चॅनलवर बातम्या पहाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
📞 विश्वास ठेवा सत्यावर — अहिल्यानगर मराठी न्यूजवर!संपर्क : शहाजी दिघे – ९४२०८०५२७७*










