अहिल्यानगर मराठी न्यूज अहिल्यानगर
शिर्डी (वार्ताहर) – शिर्डी नगरपालिका व राहाता नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना नेत्यांनी स्पष्ट केले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी निवडणुका ‘महाविकास आघाडी’ या एकत्रित पद्धतीने लढवल्या जाणार आहेत. स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतले जातील, परंतु तो निर्णय आघाडीच्या एकात्मतेतूनच घ्यायचा आहे, असा संदेश देण्यात आला.
नेत्यांनी सांगितले की, “आपण सर्व मित्रपक्ष आहोत. विचारसरणी आणि कार्यसंस्कृतीच्या पातळीवर एकत्र आलो आहोत. त्यामुळे कोणतेही मतभेद न ठेवता, परस्पर सहकार्य आणि समन्वयाने काम केल्यास निश्चितच यश मिळेल.”
बैठकीत नेत्यांनी २०१९ साली आघाडीच्या एकतेने मिळवलेले यश आठवले आणि ‘त्या एकजुटीचा आणि ताकदीचा प्रत्यय या निवडणुकीत पुन्हा द्यायचा’ असा निर्धार व्यक्त केला.
महाविकास आघाडीचा विजय म्हणजे लोकशाहीचा विजय, असा विश्वास व्यक्त करत सर्वांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र येऊन जोमाने तयारीला लागावे, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस ज्येष्ठ नेते डाॅ. एकनाथ गोंदकर, आमदार हेमंत ओगले, प्रदेश सरचिटणीस सौ. प्रभावतीताई घोगरे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सचिन गुजर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उत्तर जिल्हाध्यक्ष संदिप वर्पे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उत्तर जिल्हाप्रमुख सचिन कोते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाविकास आघाडीने आगामी शिर्डी आणि राहाता नगरपरिषदेच्या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्धार व्यक्त करत, कार्यकर्त्यांना एकजुटीने आणि समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
*आमच्या व्हिडीओ चॅनलवर बातम्या पहाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
📞 विश्वास ठेवा सत्यावर — अहिल्यानगर मराठी न्यूजवर!संपर्क : शहाजी दिघे – ९४२०८०५२७७*










