अहिल्यानगर मराठी न्यूज :प्रशांत टेके
कोपरगाव शहरालगत असलेल्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयासमोरील मुख्य रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या मार्गाने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजच्याच प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे, खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि अरुंद जागा यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
या मार्गावरून बस स्थानकाकडे दररोज पायी प्रवास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती जिवघेणी ठरत आहे. मोठ्या वाहनांची वर्दळ असताना चालणाऱ्यांना रस्त्यावरून बाजूला होण्यासाठी जागाच उपलब्ध नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गाड्यांच्या टकरीने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. काही वेळा अपघात घडल्याच्या घटना देखील निदर्शनास आल्या आहेत.
येत्या शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेण्यासाठी आलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांना देखील या दुरवस्थेचा सामना करावा लागत असून, कोपरगावसारख्या शैक्षणिकदृष्ट्या प्रगत शहरात अशा प्रकारची अडचण असणे अत्यंत दुर्दैवी आहे, असे पालकांनी सांगितले. या रस्त्याचा विकास, स्वच्छता, व काटेरी झुडपांचे तातडीने निर्मूलन होणे गरजेचे असल्याचे विद्यार्थ्यांनीही सांगितले.
स्थानिक नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पालकवर्गाने प्रशासनाला तातडीने या रस्त्याची डागडुजी, झाडाझुडपांची छाटणी आणि योग्य दिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या संभाव्य घटना टाळण्यासाठी विद्यार्थी हिताची कार्यवाही अपेक्षित आहे. स्थानिक प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखी मागणी सर्व स्तरातून होत आहे.