अहिल्यानगर मराठी न्युज : शहाजी दिघे
अहिल्यानगर : शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या असलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेशासाठी अर्ज केलेल्या १० लाख ६६ हजार विद्यार्थ्यांमधून केवळ ५० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश केव्हा मिळणार आणि त्यांचे वर्ग केव्हा सुरू होणार? असा प्रश्न पालक वर्गातून उपस्थित होत आहे. मात्र. शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १० जुलैपासून १३ जुलै पर्यंत प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदवता येणार आहेत.
शिक्षण विभागातर्फे यंदा प्रथमच राज्यातील सर्व जिल्ह्यांत अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. प्रवेशासाठी २१ लाख ३१ हजार ७२० जागा असून त्यातील केवळ ५ लाख ८ हजार ९६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.अकरावी प्रवेशासाठी ९ हजार ४६६ महाविद्यालयांमधील जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीअंतर्गत अलौटमेन्ट झालेल्या जागांवर प्रवेश घेण्यासाठी ७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी कॅप राऊंड मधून केवळ ४ लाख ३२ हजार २८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या राज्यातील १५ लाख १५ हजार ६२८ जागा अजूनही रिक्त आहेत.
शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार १० ते १३ जुलै या कालावधीत प्रवेशच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची कट ऑफ नुसार गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थी १८ ते २१ जुलै या कालावधीत प्रत्यक्ष संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेऊ शकतात. तर २३ जुलै रोजी तिसऱ्या फेरीसाठी प्रवेशाच्या रिक्त जागा जाहीर केल्या जाणार असल्याचे समजते.