September 11, 2025 1:24 pm

गोदावरी महाआरतीच्या तेजस्वी प्रकाशात भक्तीमय गोदाकाठ : संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर मराठी न्यूज : प्रशांत टेके

कोपरगाव : श्रावण मासातील प्रत्येक सोमवारचा शुभमुहूर्त साधत कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गंगा गोदावरीची पहिल्या श्रावणी सोमवारी महाआरती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाली. कोपरगावच्या अध्यात्मिक परंपरेला जपत, गोदावरी नदीच्या तीरावर भगवान शंकराच्या भक्तीत रंगलेल्या या आरती सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

ही गंगाआरती संकल्पना युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चैतन्याला चालना मिळत आहे. कार्यक्रमास सदगुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती परम पूज्य रमेशगिरीजी महाराज यांचे विशेष आशीर्वाद लाभले.त्यांनी श्रावण मासाचे महत्व सांगून या उत्कृष्ठ आयोजनाबद्दल विवेकभैय्या कोल्हे आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कौतुक केले.आपल्या संस्कृतीचे जतन हे सर्व करत असून काशीच्या धर्तीवर महाराष्ट्रात प्रथमच ही गंगा गोदावरीची महाआरती करण्याची संकल्पना प्रतिष्ठानने सुरू केली आहे ती सर्वत्र आदर्श म्हणून पाहिली जाते असेही रमेशगिरी महाराज म्हणाले.

यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी भाविकांचे स्वागत करत गोदावरीचे महत्त्व कोपरगावसह महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यात किती मोलाचे आहे हे सांगितले. आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी महिला भगिनींसाठी श्रावणाच्या पवित्र गंगा आरतीची पर्वणी असल्याने आनंद व्यक्त केला. श्रावणाचे महत्व आपल्या संस्कृतीत आणि अध्यात्मिक विश्वात मोलाचे असून या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल युवानेते विवेकभैय्या कोल्हे आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवकांचे कौतुक करून भाविकांचे स्वागत केले.यावेळी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. भाविकांनी गंगेच्या काठी आरतीच्या दिव्य प्रकाशात जलमग्न होणारा आध्यात्मिक अनुभव घेतला. “हर हर महादेव”, “गंगा मैय्या की जय” च्या जयघोषात संपूर्ण गोदातीर भक्तिभावाने निनादला.

या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहर व परिसरातील हजारो भाविक भक्त, आजी-माजी पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, नदी सुरक्षा दलाचे बोट चालक आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे समर्पित युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा हा उपक्रम अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणारा ठरला असून, गोदावरी काठावरील धार्मिक ऊर्जा अधिक प्रभावीपणे प्रकट करण्यास कारणीभूत ठरतो आहे. पुढील श्रावणी सोमवारलाही याच उत्साहाने आरती आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें