अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
सोनगाव प्रतिनिधी: संगमनेर तालुका रहिमपूर गावात मंगळवारी २६ ऑगस्ट मध्यरात्री बिबट्याने लोकवस्तीत घुसून ६८ वर्षीय अरुणाबाई रामनाथ शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून नगर येथील सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेमुळे गावात मोठी दहशत पसरली आहे.
अरुणाबाई शिंदे या रात्री नेहमीप्रमाणे घरासमोरील ओट्यावर झोपल्या होत्या. मध्यरात्री साधारण १२ वाजता शिकारीच्या शोधात गावात आलेल्या बिबट्याने त्यांना सावज समजून झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावरआणि बोटांवर गंभीर जखमा झाल्या. वृध्द महिलेच्या आक्रोशाने कुटुंबीय आणि गावकरी जागे झाले. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने नगर येथे हलविण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर वनविभागाने तातडीने गावात ३ पिंजरे लावले असून सकाळी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचा शोध सुरू केला आहे. “गावात सतत गस्त ठेवली जाईल आणि नागरिकांनी रात्री घराबाहेर झोपणे टाळावे, असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी, संगमनेर भाग २ चे सागर केदार यांनी केले.