September 11, 2025 1:17 pm

पंचांची कॉलर पकडली, लाथ मारली; ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईन म्हणून षडयंत्र रचले, राग अनावर झालेला शिवराज राक्षे काय म्हणाला?

अहिल्यानगर

अहिल्यानगर :आपले दोन्ही खांदे टेकले नव्हतेच, कुस्तीही चितपट झाली नाही. तरीही पंचांनी आपल्याला पराभूत घोषित केलं. म्हणूनच रागाच्या भरात त्यांना लाथ मारली अशी प्रतिक्रिया पैलवान शिवराज राक्षे याने दिली.

मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईन म्हणूनच मला जाणूनबुजून पराभूत करण्यात आलं. पंचांनी आपल्यावर अन्याय केला असा आरोप शिवराज राक्षेने केला. अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या ६७ व्या कुस्ती स्पर्धेत गोंधळ झाल्यानंतर शिवराज राक्षेने माध्यमांशी संवाद साधला आणि आपली बाजू मांडली.

महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनल सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात थेट लढत झाली. त्यामध्ये सामन्यात पंचांनी शिवराज राक्षेच्या विरोधात निर्णय घेतला आणि पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं. त्यामुळे राग अनावर झालेल्या शिवराज राक्षेने पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथही मारली. आपले दोन्ही खांदे टेकली नव्हते, पाठही टेकली नव्हती. तरीही आपल्याला पराभूत केलं. रिव्ह्यूचा निर्णयही ऐकून घेण्यात आला नाही असा आरोप शिवराज राक्षेने केला.

 रिव्ह्यू पाहून निर्णय द्यावा, राक्षेची मागणी

आपण तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकू नये म्हणून आपल्यावर अन्याय करण्यात आला असा आरोप शिवराज राक्षेने केला. तो म्हणाला की, आपले दोन्ही खांदे टेकले नव्हते, पाठही टेकली नव्हती. तसं असेल तर स्वतः हार मानतो. आपल्याला पराभूत करण्यासाठी हे जाणूनबुजून करण्यात आलं. त्यावर आपण रिव्ह्युची मागणी केली आहे. सामन्याचा व्हिडीओ पाहून त्यावर निर्णय द्यावा अशी मागणी आपण केली आहे.

निर्णय मान्य नाही, राक्षेच्या कोचची भूमिका

दुसरीकडे शिवराज राक्षेच्या कोचनेही पंचांवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, कुस्तीत दोन्ही खांदे टेकले असते तर शिवराज हारला असता. तसे असते तर मी स्वतः त्याला बाजूला नेलं असतं. पण पंचाच्या निर्णयावर अपील देणं गरजेचं होतं. टीम रेफ्रीने स्क्रीनवरती पाहून निर्णय देणं गरजेचं होतं. आम्हाला हा निर्णय मान्य नाही

सामना पुन्हा होऊ शकतो का?

या सामन्याच्या निर्णयाच्या रिव्हयूची मागणी शिवराज राक्षेने केली आहे. रिव्ह्यू घेतला गेला आणि त्याचे दोन्ही खांदे टेकले नसतील तर पुन्हा एकदा कुस्ती घेतली जाऊ शकते. रिव्ह्यू घेण्याचा अधिकार हा प्रत्येक स्पर्धकाचा अधिकार आहे. तो पंचांनी मान्य केला पाहिजे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचं दिसून आलं. पृथ्वीराज मोहोळकडून पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचाना लाथ मारली आणि स्पर्धेच्या ठिकाणी एकच गोंधळ झाला. पंचांचा निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षेने हे कृत्य केलं.

यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचं दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें