संगमनेर :प्रतिनिधी
संगमनेर : लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या वतीने मालपाणी उद्योग समूहाचे प्रेरणास्थान आणि व्यायामाची आवड असणारे उद्योजक स्व.माधवलाल मालपाणी यांच्या स्मरणार्थ सफायर मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन मालपाणी लॉन्स येथे केले होते.सकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेमध्ये लहान वयोगटापासून तर तरूण आणि वृध्दांनी आपला सहभाग नोंदविला.
अतिशय चैतन्य, उत्साह आणि जोमाने ही स्पर्धा सर्वच स्पर्धकांनी पूर्ण केली.७ किमी आणि १० किमी अशा दोन गटात ही मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.यावर्षी लहान मुले-मुली यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.अनेक वृध्दांनी १० किमी स्पर्धा पूर्ण करत सौ शहरी एक संगमनेरी ही उक्ती सार्थ केली.
स्पर्धेचे हे १२ वे वर्ष होते.क्लबचे संस्थापक अध्यक्ष व सफायर मॅरेथॉनचे प्रणेते उद्योजक गिरीश मालपाणी,माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी,प्रफुल्ल खिंवसरा आणि राजेश मालपाणी यांनी झेंडा फडकवून स्पर्धेला सुरूवात केली. मालपाणी उद्योग समूह,स्वदेश प्रॉपर्टीज, मालपाणी बजाज चेतक यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. एव्हरी रनर इज विनर या थीमअंतर्गत प्रत्येक स्पर्धकाला सर्टिफिकेट ,मेडल आणि कॅप वितरीत करण्यात आले.स्पर्धा पूर्ण केल्यानंतर स्पर्धकांना नाश्ता आणि चहा वाटप करण्यात आला. स्पर्धकांनी लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या या स्पर्धेचे कौतुक केले.स्पर्धकांना सर्टिफिकेट आणि मेडल्सचे वाटप माल पाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी, स्वदेश उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब देशमाने,मालपाणी बजाज चेतकचे सचिन पलोड,निलम खताळ,सत्यम वारे यांच्या हस्ते करण्यात आले.