अहिल्यानगर :प्रतिनिधी
अहिल्यानगर :- सामाजिक व उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार आहे.त्यांचे कार्य समाजापुढे आल्यास इतरांना प्रेरणा मिळणार असल्याचे प्रतिपादन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.तर सदृढ पिढीसाठी मातीचा अभिमान बाळगा,माती वाचवा व चांगले विषमुक्त अन्न पिकवण्याचा संदेश त्यांनी दिला.
ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने सावेडी येथील माऊली सभागृहात राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात पद्मश्री पोपरे बोलत होत्या.पद्मश्री पोपेरे म्हणाल्या की,निसर्गाची जी शाळा शिकले,ते समाजापुढे मांडत आहे. केमिकलयुक्त रासायनिक खतामुळे आजार वाढले असून,पुन्हा सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी वळावे लागणार आहे.माती वाचली तर पुढची पिढी वाचणार आहे.माती चांगली राहिली तर चांगले अन्न येणार आणि चांगल्या अन्नातून भारताची सक्षम पिढी घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.विषमुक्त अन्नासाठी त्यांनी सेंद्रिय खतांचा अवलंब करून शेती करण्याचे आवाहन केले.राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्ड सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सीए शंकर अंदानी,प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका सरोज अल्हाट,सामाजिक कार्यकर्ते अमोल आल्हाट,आर्चिड प्री स्कूलच्या प्राचार्या शितल साळवे,ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या संचालिका सुप्रिया चौधरी,सारिका शेलार,संचालक प्रवीण साळवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.